क्रिकेटचे नवे ‘वैभव’   

मडविकेट,कौस्तुभ चाटे 

‘आय पी एल’च्या सध्या सुरु असलेल्या हंगामात राजस्तान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांमध्ये सामना सुरु होता. लखनौ संघाची फलंदाजी झाली आणि राजस्तान संघाकडून दोन सलामीवीर मैदानात उतरले. त्यापैकी एका फलंदाजाकडे बघून ’हा इथे काय करतोय?’ ही भावना  सामना बघणार्‍या प्रत्येकाच्या नजरेत होती. ज्यांना तो खेळाडू माहित होता, त्यांच्या मनात एकच भावना होती, ती म्हणजे, ’तो’ चांगला खेळू दे. ज्यांना त्याच्याविषयी ठाऊक नव्हते ते आश्चर्यचकित झाले होते, त्या खेळाडूचं वय बघून. 
 
तो १४ वर्षांचा फलंदाज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या गोलंदाजांचा सामना करणार होता. डावाच्या चौथ्या चेंडूवर तो स्ट्राईकला आला, आणि त्याला पडलेला पहिलाच चेंडू त्याने कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून दिला. तो चेंडू थेट प्रेक्षकांत पडला आणि ’वैभव सूर्यवंशी’ने आयपीएल मैदानावर आपल्या आगमनाची एक झलक दाखवली.  वैभव सध्या सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत बनला आहे. ४-५ महिन्यांपूर्वी आयपीएलच्या लिलावात त्याला राजस्तान संघाने खरेदी केलं तेव्हा देखील सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. 
 
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर नावाच्या एका गावात जन्मलेल्या वैभवने १२ वर्षांचा असताना बिहार संघासाठी प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ही कामगिरी करणारा तो ’सर्वात तरुण’ खेळाडू नसला तरीही त्याच्या वयामुळे त्याची चर्चा होणे स्वाभाविक होते  सलामीला फलंदाजी करणारा वैभव एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. १२ व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण, पुढच्या वर्षी म्हणजे १३ वर्षांचा असताना लिस्ट ए क्रिकेट आणि टी-२०  क्रिकेटमध्ये पदार्पण असे काही विशेष रेकॉर्डस् आता त्याच्या नावावर आहेत. त्यात आता आयपीएलची देखील भर पडली आहे. आयपीएलमध्ये खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी इतक्या मोठ्या पातळीवर खेळणे नक्कीच सोपे नाही. त्याच्या समोर असलेल्या अनेक खेळाडूंचा अनुभव त्याच्या वयापेक्षाही जास्त आहे. आयपीएलचा दर्जा वेगळाच आहे. देशोदेशीचे अनेक खेळाडू या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी त्यांच्यासमोर धावा करणे सोपे नक्कीच नाही. वैभव पहिला चेंडू खेळत होता, तेव्हा त्याला गोलंदाजी करत होता शार्दूल ठाकूर. मुंबई आणि भारतीय संघासाठी खेळणारा, भारताचा एक प्रमुख गोलंदाज. पण वैभव नक्कीच डगमगला नाही. हे पदार्पण गाजवायचेच हे ठरवून आल्यासारखा वैभव त्या चेंडूला समोर गेला, आणि पुढे जे झालं त्याची इतिहासाने नक्कीच नोंद घेतली असणार. 
 
१९८८ साली, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अशाच एका १५ वर्षांच्या मुलाने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी सगळ्या मुंबईचे डोळे त्याच्याकडे होते. वैभवच्या बाबतीत सगळ्या देशाची नजर त्याच्याकडे होती. राजस्तान संघाने त्याची निवड केली, त्याला १.१० कोटी रुपयांचे मानधन देऊ केले, याचाच अर्थ त्या संघाने, आणि कप्तान संजू सॅमसन आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याच्यावर ठेवलेला विश्वास. वैभवनेही हा विश्वास सार्थ ठरवला. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने २० चेंडूत ३४ धावा केल्या, ज्यामध्ये २ चौकार आणि ३ षटकार होते. त्याच्या या कामगिरीची दखल  माध्यमांनी  तर घेतलीच, पण प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी, अगदी प्रतिस्पर्धी संघ मालकांनी देखील त्याचे कौतुक केले. त्या सामन्यात त्याच्या संघाचा पराभव झाला, पण त्याच्या कामगिरीने मात्र सगळ्यांनाच प्रभावित केले. 
 
आपल्याकडे खेळाडूच्या वय चोरीच्या कथा कमी नाहीत. किंबहुना क्रिकेटला - भारतीय क्रिकेटला देखील, लागलेला हा एक शाप आहे. वैभवच्या वयाबद्दलही अनेकवेळा प्रश्न उपस्थित केले गेले. वैभवचा जन्म २७ मार्च २०११ चा आहे . त्याने फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या वयाबद्दल चर्चा होणे स्वाभाविक होते. त्याच्या अनेक चाचण्या केल्यानंतर त्याची वय निश्चिती करण्यात आली असेल. युवा खेळाडूंच्या बाबतीत हे अनेकदा होते. काहीही असले तरीही ज्या धाडसाने, आक्रमकतेने तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सामोरा गेला ते कौतुकास्पद आहे. वयाच्या तेराव्या वर्षीच तो भारताच्या १९ वर्षांखालील संघातून खेळला आहे. २०२३ मध्ये एका चौरंगी मालिकेत त्याने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्या मालिकेत देखील तुलनेने मोठ्या प्रतिस्पर्ध्यांसमोर त्याने चांगला खेळ केला. त्या मालिकेत त्याने २ अर्धशतके देखील झळकावली होती. तेव्हापासूनच त्याच्या कामगिरीकडे भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष आहे. 
 
गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट खूप बदललं आहे. सचिन किंवा युवराजने पदार्पण केले तेव्हा अजूनही कसोटी क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळले जात होते. त्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून या दोन्ही खेळाडूंनी एकदिवसाच्या आणि पुढे टी-२० क्रिकेटमध्ये नाव कमावले. पण वैभवची सुरुवात टी-२० च्या जमान्यातील आहे. त्याचा आक्रमकपणा नैसर्गिक आहे. आज आयपीएल मध्ये खेळणे हे खेळाडूंसाठी मानाचे समजले जाते. तिथून येणारा पैसा, तिथे असलेलं ग्लॅमर यामुळे भले भले खेळाडू बिघडतात. या चक्रव्यूहातून बाहेर पडून योग्य खेळ करणे, चांगली कामगिरी करून आपल्या संघाला विजय मिळवून देणे हे वैभवसाठी आव्हान असणार आहे. आज संपूर्ण जगाची नजर त्याच्याकडे असेल. त्या अपेक्षांचं ओझं घेऊन त्याला खेळावं लागेल. अशावेळी संयमित खेळ करून आपला प्रभाव पाडणे हे देखील त्याच्यासाठी महत्त्वाचे असेल.आयपीएलनंतरही तो कशी कामगिरी करतो यावर त्याच्यासाठी बरेच काही अवलंबून आहे. 
 
वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट जगतात ’हॉट केक’ आहे. यापुढे त्याच्या प्रत्येक गोष्टीवर माध्यमांची आणि रसिकांची देखील नजर असेल. पण त्याला या अग्निदिव्यातून  वर यावेच लागेल. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे जितक्या लवकर त्याला समजेल तितक्या लवकर तो ’मॅच्युअर’ होईल, आणि तितक्याच लवकर तो एक खेळाडू म्हणून अजून मोठा होईल. हे त्याचे अगदीच सुरुवातीचे दिवस आहेत. पुढे जाऊन तो वेगवेगळ्या स्तरावर, देशांतर्गत  क्रिकेटमध्ये, इतर देशांमध्ये कशी कामगिरी करतो ते बघूनच त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबद्दल बोलता येईल. सध्या त्याने त्याच्या खेळाचा आनंद घ्यावा हेच महत्वाचे. वयाच्या चौदाव्या वर्षी तुम्ही-आम्ही काय करत होतो हे कदाचित आठवावेच लागेल. कदाचित आपण कोणीच काहीच करत नव्हतो, पण आपल्यातलाच एक - वैभव सूर्यवंशी, मोठ्या दर्जाचं क्रिकेट खेळतो आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी त्याला प्रोत्साहन देऊन त्याचे मनोधैर्य वाढवणे हे क्रिकेटप्रेमी म्हणून आपले कर्तव्यच नाही का?     

Related Articles